Saturday, April 21, 2012

आता कळले तुला पाऊस आला कशामुळे?

ढगांच्या शाळेतून एक ढग पळाला, 
हा प्रकार काही त्याच्या सरांना नाही कळाला
जणू तो ढग हवेत गेला विरून,
हा पठ्या मात्र आला अख्या आभाळात फिरून

ढगाला जायचे होते बागेत,
किंवा निळ्या तलावातल्या छोट्याश्या नावेत,
वाटले त्याला खाऊ मस्त भेळ, चिंचा आणि बर्फाचे गोळे,
त्यावर पिऊ गार गार गोड गोड शहाळे.

हे सगळे करून ढग चौपाटीवर गेला,
वाळूत लोळून लोळून धुळीत पूर्ण माखला.
चौपाटीवरून निघताना मात्र सरांनी धरला त्याचा कान,
हातावर छडी मारून विचारले, "कशाला मारलीस शाळेला टांग?"
खेळून खेळून झाला आहेस तू काळा-काळा,
आता सांगतो तुझ्या आई-बाबांना कि तू बुडावलीस शाळा...

बिचाऱ्या ढगाचे भरून आले डोळे,
आता कळले तुला पाऊस आला कशामुळे??

No comments:

Post a Comment