सदर लेखात आणि पुलंच्या 'तुम्हाला कोण व्हायचंय - पुणेकर, मुंबईकर कि नागपूरकर' ह्या लेखात साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग न समजता पुलंच्या आठवणींना चढवलेली फुलं आहेत असे समजावे.
तुम्हाला कोण व्हायचय - Facebookधारी, Twitterधारी कि Instagramधारी?
2G, 3G आणि 4G ची भाजी स्वस्तात मिळू लागल्यानंतर डोक्याची मंडई करणाऱ्या बऱ्याच सोशल नेटवर्किंग साइट्सचे पेव फुटले आहे. तसे तुम्ही ह्यातील कोणत्याही साईटचे धारी (जो ही सोशल नेटवर्किंग साईट आपल्या मोबाइल मध्ये धारण करी, तो धारी), पण सध्याच्या जमान्यात फेसबुक, ट्विटर, अथवा इन्स्टाग्राम वर जनतेच्या जिभेला जी धार चढते ती आजमावून बघितल्यावर हे तीनच धारी भारी असल्याची खात्री पटते. तसे पहायला गेले तर हे तीनही धारी आपापल्या साईट वर बरीच वाग्युद्ध लढवत असतात. त्यामुळे आम्ही विचार केला कि जे कोणी मर्द आणि मर्दानी (स्त्री-शक्ती वाल्यांचा मोर्चा नको रे बाप्पा) असतील ज्यांना फेसबुक, ट्विटर, वा इन्स्टाग्राम वर बाजी लढवायची असेल त्यांना ढाल-तलवारी पुरवाव्यात. त्याचसाठी करत आहे हा अट्टाहास.
तुम्हाला फेसबुक धारी व्हायचे आहे का? अगदी सोप्पं आहे. कधीही, कुठेही काहीही आणि कितीही (मर्यादित शब्द वापरायची अट ट्विटर आणि इन्स्टाग्राम वर, इथे नव्हे) लिहिता आलं पाहिजे. अजिबात लाजायचं नाही. हे फेसबुक म्हणजे असे आहे राजा, जो लाजला तो संपला. आपलं मत ठणकावून मांडता आलं पाहिजे. आणि ह्या उप्पर My Choice असेही म्हणू शकता तुम्ही - म्हणजे काय वाट्टेल ते म्हणायला मोकळे! फेसबुक तुम्हाला खालील गोष्टी करण्याची मुभा देते
* Check in - कुठे कडमडताय तुम्ही?
* What's on your mind - तुमचे अमुल्य बोल
* Photos - मुख्यतः तुम्ही कुठेतरी गेले आहात किंवा तुमच्याकडे बराच आधुनिक कॅमेरा आहे हे सिद्ध करणारे फोटो
ह्या बरोबरच तुम्ही
* Profile Information उ.दा. Marital Status - एकटा जीव सदाशिव का विवाहोत्सुक वा लग्नाळलेले आहात ह्या सारखी अत्यंत महत्वाची माहिती
* Profile Picture - ओठांचा चंबू केलेले किंवा चेहऱ्याचा उजवा अथवा डाव्या भागाचे किंवा इतर बऱ्याच कोनात काढलेले तुमचे देखणे रूपडे टाकू शकता. पण फोटो कुठलेही असोत पण तुमच्या आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा पॅन कार्ड वरचे नसावेत. लक्षात ठेवा तुम्ही कसे आहात ह्या पेक्षा तुम्ही कसे दिसता हे महत्वाचे आहे. आमच्या मते म्हणूनच हे 'Face'book आहे.
पण जर तुम्हाला भरघोस Likes हवे असतील तर तुमचे मुलगी असणे वा कोणा मुलीबरोबर तुमचा फोटो असणे अत्यंत गरजेचे आहे. तसे नसल्यास तुम्ही कोणी celebrity असणे किंवा तद्दन मुर्खपणाचे चाळे करत असणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला नोबेल प्राइज मिळाले तरी likes मिळतील ह्याची खात्री नाही.
तुम्हाला इन्स्टाग्रामधारी व्हायचे आहे का? अगदी सोप्प आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्याकडे कॅमेरा असलेला फोन असायला हवा. म्हणजे प्रत्येक क्षणी तुम्ही तुमच्या असंख्य लीला अवघ्या जगाला दाखवू शकता. अर्थात फेसबुकप्रमाणे इथेही फोटोंच्या बाबतीत वरील नियमच लागू होतात. तर तुम्ही तुमच्या लीला श्रीकृष्णाच्या बाललीलांप्रमाणे अवघ्या विश्वाला दाखवू शकता. जसे, मी आइसक्रीम खाल्ल - हां घे माझा आइसक्रीम खातानाचा फोटो, आइसक्रीम खाल्लच पण ह्या दुकानात खाल्ल - हा घे माझा दुकानाबाहेरचा फोटो. मग बिलाचा, मेनूचा, टेबलाचा, टेबल क्लॉथचा, फ्लॉवरपॉटचा, फुलांचा, खुर्चीचा, वेटरचा, मोकळ्या ग्लासचा, अर्ध्या भरलेल्या ग्लासचा, पूर्ण भरलेल्या ग्लासचा, वरच्या पंख्याचा, टीव्हीचा, टीव्हीवर चालु असणाऱ्या कार्यक्रमचा, त्यात मधे येणाऱ्या ब्रेक मधल्या जाहिरातीचा, दुकानातल्या काचेमधून बाहेर दिसणाऱ्या दुसऱ्या दुकानाचा, बाहेर उभ्या तरुणीचा / तरुणाचा, गाडीचा ऐसे असंख्य फोटो काढता यायला हवे. पण हे काम तिन्ही त्रिकाळ चालु हवे. आणि हे फोटो वेगवेगळ्या फोटो इफेक्ट सहित हवेत. मन कितीही कुरूप असो हे कॅमेरे तुम्हाला सुंदर बनवतातच (म्हणजे तुम्ही इतरांना बनवायला मोकळे).
आता तुम्हाला ट्विटरधारी व्हायचे आहे का? जरूर व्हा पण हजार वेळा विचार करा. कारण इकडे तुम्ही कितीही लिहू शकत नाही अवघ्या 140 अक्षरांचा / Characters चा खेळ आहे. त्यामुळे किमान शब्दात तुम्हाला कमाल दाखवता आली पाहिजे. त्यामुळे शब्दांना कात्री लावायल यायला हवी. पण घाबरू नका, एवढ्या छोट्या जागेत पण अव्वल दर्जाचा उच्छाद मांडता येतो. त्यासाठी काही छोटेखानी शब्द वापरायल शिकावे लागेल. उ.दा. K, D, U, PLZ, B4, IDK, HBD, HAND...(जागेच्या अभावी सध्या फक्त शब्दच देत आहोत, त्यांचा अर्थ आणि वापर कधी करावा हे पुढील लेखात सांगू). पण लक्षात ठेवा ट्विटरवरचे तुमचे उदात्त विचार जगात कोणीही वाचू शकतो. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तुमचे मित्रच /अनुयायी - followersच फक्त तुमचे विचार वाचू शकतात. पण कोण काय वाचेल, काय बोलेल याची चिंता नसावी, तुमच्यापेक्षा जास्त माकडचाळे करणारे काही सेलिब्रिटी ह्या बाबतीत तुमचे गुरुही बनू शकतात.
ह्या तीनही सोशल नेटवर्किंग साइट् वर तुम्हाला तुमचे गाठोडे जगपुढे मोकळे करता यायला हवे. वाट्टेल ते लिहा, वाट्टेल तसे. पण आपल्या मताचा जाज्वल्य अभिमान हवा. कोणी निषेध नोंदवलाच तर त्याची खिल्ली उडवता आली पाहिजे. मुद्देसुद बोलून वाद घालायची गरजच काय जर आपण काहीही बोलू शकतो? नाहीतर सरळ विषय बदलून दुसरेच काहीतरी खुस्पट काढावे. ते पण जमत नसेल तर स्पेलिंग मिस्टेक्स.
असो, तुम्हाला कोणीही धारी बनायचे असेल तरी एक नियम सर्वात महत्वाचा आहे जो आपल्या पुलंनी कधीच लिहून ठेवला आहे. हां त्यांनी तो पुणेकरांसाठी लिहिला होता पण तो फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरधारींसाठी चपखल बसतो: कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय एकूण कर्तृत्व काय याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचे. विषय कुठलाही असो.
हा प्रबोधनकारी लेख लिहून सदर लेखकाला कोणत्याही धारींच्या रोषाला बळी पडायचे नाही, त्यामुळे चु. भू. दया. घ्या. आणि हसून सोडून दया. K. Tx