Friday, May 1, 2015

तुम्हाला कोण व्हायचय - Facebookधारी, Twitterधारी कि Instagramधारी?

सदर लेखात आणि पुलंच्या 'तुम्हाला कोण व्हायचंय - पुणेकर, मुंबईकर कि नागपूरकर' ह्या लेखात साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग न समजता पुलंच्या आठवणींना चढवलेली फुलं आहेत असे समजावे. 

तुम्हाला कोण व्हायचय - Facebookधारी, Twitterधारी कि Instagramधारी?

2G, 3G आणि 4G ची भाजी स्वस्तात मिळू लागल्यानंतर डोक्याची मंडई करणाऱ्या बऱ्याच सोशल नेटवर्किंग साइट्सचे पेव फुटले आहे. तसे तुम्ही ह्यातील कोणत्याही साईटचे धारी (जो ही सोशल नेटवर्किंग साईट आपल्या मोबाइल मध्ये धारण करी, तो धारी), पण सध्याच्या जमान्यात फेसबुक, ट्विटर, अथवा इन्स्टाग्राम वर जनतेच्या जिभेला जी धार चढते ती आजमावून बघितल्यावर हे तीनच धारी भारी असल्याची खात्री पटते. तसे पहायला गेले तर हे तीनही धारी आपापल्या साईट वर बरीच वाग्युद्ध लढवत असतात. त्यामुळे आम्ही विचार केला कि जे कोणी मर्द आणि मर्दानी (स्त्री-शक्ती वाल्यांचा मोर्चा नको रे बाप्पा) असतील ज्यांना फेसबुक, ट्विटर, वा इन्स्टाग्राम वर बाजी लढवायची असेल त्यांना ढाल-तलवारी पुरवाव्यात. त्याचसाठी करत आहे हा अट्टाहास. 

तुम्हाला फेसबुक धारी व्हायचे आहे का? अगदी सोप्पं आहे. कधीही, कुठेही काहीही आणि कितीही (मर्यादित शब्द वापरायची अट ट्विटर आणि इन्स्टाग्राम वर, इथे नव्हे) लिहिता आलं पाहिजे. अजिबात लाजायचं नाही. हे फेसबुक म्हणजे असे आहे राजा, जो लाजला तो संपला. आपलं मत ठणकावून मांडता आलं पाहिजे. आणि ह्या उप्पर My Choice असेही म्हणू शकता तुम्ही - म्हणजे काय वाट्टेल ते म्हणायला मोकळे! फेसबुक तुम्हाला खालील गोष्टी करण्याची मुभा देते
* Check in - कुठे कडमडताय तुम्ही?
* What's on your mind - तुमचे अमुल्य बोल
* Photos - मुख्यतः तुम्ही कुठेतरी गेले आहात किंवा तुमच्याकडे बराच आधुनिक कॅमेरा आहे हे सिद्ध करणारे फोटो
ह्या बरोबरच तुम्ही
* Profile Information उ.दा. Marital Status - एकटा जीव सदाशिव का विवाहोत्सुक वा लग्नाळलेले आहात ह्या सारखी अत्यंत महत्वाची माहिती
* Profile Picture - ओठांचा चंबू केलेले किंवा चेहऱ्याचा उजवा अथवा डाव्या भागाचे किंवा इतर बऱ्याच कोनात काढलेले तुमचे देखणे रूपडे टाकू शकता. पण फोटो कुठलेही असोत पण तुमच्या आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा पॅन कार्ड वरचे नसावेत. लक्षात ठेवा तुम्ही कसे आहात ह्या पेक्षा तुम्ही कसे दिसता हे महत्वाचे आहे. आमच्या मते म्हणूनच हे 'Face'book आहे. 
पण जर तुम्हाला भरघोस Likes हवे असतील तर तुमचे मुलगी असणे वा कोणा मुलीबरोबर तुमचा फोटो असणे अत्यंत गरजेचे आहे. तसे नसल्यास तुम्ही कोणी celebrity असणे किंवा तद्दन मुर्खपणाचे चाळे करत असणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला नोबेल प्राइज मिळाले तरी likes मिळतील ह्याची खात्री नाही.

तुम्हाला इन्स्टाग्रामधारी व्हायचे आहे का? अगदी सोप्प आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्याकडे कॅमेरा असलेला फोन असायला हवा. म्हणजे प्रत्येक क्षणी तुम्ही तुमच्या असंख्य लीला अवघ्या जगाला दाखवू शकता. अर्थात फेसबुकप्रमाणे इथेही फोटोंच्या बाबतीत वरील नियमच लागू होतात. तर तुम्ही तुमच्या लीला श्रीकृष्णाच्या बाललीलांप्रमाणे अवघ्या विश्वाला दाखवू शकता. जसे, मी आइसक्रीम खाल्ल - हां घे माझा आइसक्रीम खातानाचा फोटो, आइसक्रीम खाल्लच पण ह्या दुकानात खाल्ल - हा घे माझा दुकानाबाहेरचा फोटो. मग बिलाचा, मेनूचा, टेबलाचा, टेबल क्लॉथचा, फ्लॉवरपॉटचा, फुलांचा, खुर्चीचा, वेटरचा, मोकळ्या ग्लासचा, अर्ध्या भरलेल्या ग्लासचा, पूर्ण भरलेल्या ग्लासचा, वरच्या पंख्याचा, टीव्हीचा, टीव्हीवर चालु असणाऱ्या कार्यक्रमचा, त्यात मधे येणाऱ्या ब्रेक मधल्या जाहिरातीचा, दुकानातल्या काचेमधून बाहेर दिसणाऱ्या दुसऱ्या दुकानाचा, बाहेर उभ्या तरुणीचा / तरुणाचा, गाडीचा ऐसे असंख्य फोटो काढता यायला हवे. पण हे काम तिन्ही त्रिकाळ चालु हवे. आणि हे फोटो वेगवेगळ्या फोटो इफेक्ट सहित हवेत. मन कितीही कुरूप असो हे कॅमेरे तुम्हाला सुंदर बनवतातच (म्हणजे तुम्ही इतरांना बनवायला मोकळे).

आता तुम्हाला ट्विटरधारी व्हायचे आहे का? जरूर व्हा पण हजार वेळा विचार करा. कारण इकडे तुम्ही कितीही लिहू शकत नाही अवघ्या 140 अक्षरांचा / Characters चा खेळ आहे. त्यामुळे किमान शब्दात तुम्हाला कमाल दाखवता आली पाहिजे. त्यामुळे शब्दांना कात्री  लावायल यायला हवी. पण घाबरू नका, एवढ्या छोट्या जागेत पण अव्वल दर्जाचा उच्छाद मांडता येतो. त्यासाठी काही छोटेखानी शब्द वापरायल शिकावे लागेल. उ.दा. K, D, U, PLZ, B4, IDK, HBD, HAND...(जागेच्या अभावी सध्या फक्त शब्दच देत आहोत, त्यांचा अर्थ आणि वापर कधी करावा हे पुढील लेखात सांगू). पण लक्षात ठेवा ट्विटरवरचे तुमचे उदात्त विचार जगात कोणीही वाचू शकतो. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तुमचे मित्रच /अनुयायी - followersच फक्त तुमचे विचार वाचू शकतात. पण कोण काय वाचेल, काय बोलेल याची चिंता नसावी, तुमच्यापेक्षा जास्त माकडचाळे करणारे काही सेलिब्रिटी ह्या बाबतीत तुमचे गुरुही बनू शकतात.

ह्या तीनही सोशल नेटवर्किंग साइट् वर तुम्हाला तुमचे गाठोडे जगपुढे मोकळे करता यायला हवे. वाट्टेल ते लिहा, वाट्टेल तसे. पण आपल्या मताचा जाज्वल्य अभिमान हवा. कोणी निषेध नोंदवलाच तर त्याची खिल्ली उडवता आली पाहिजे. मुद्देसुद बोलून वाद घालायची गरजच काय जर आपण काहीही बोलू शकतो? नाहीतर सरळ विषय बदलून दुसरेच काहीतरी खुस्पट काढावे. ते पण जमत नसेल तर स्पेलिंग मिस्टेक्स.

असो, तुम्हाला कोणीही धारी बनायचे असेल तरी एक नियम सर्वात महत्वाचा आहे जो आपल्या पुलंनी कधीच लिहून ठेवला आहे. हां त्यांनी तो पुणेकरांसाठी लिहिला होता पण तो फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरधारींसाठी चपखल बसतो: कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय एकूण कर्तृत्व काय याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचे. विषय कुठलाही असो.

हा प्रबोधनकारी लेख लिहून सदर लेखकाला कोणत्याही धारींच्या रोषाला बळी पडायचे नाही, त्यामुळे चु. भू. दया. घ्या. आणि हसून सोडून दया. K. Tx

Sunday, September 28, 2014

गगनास...(सावरकरांच्या 'सागरास' कवितेवरून स्फुरलेली कविता)

नेशील का धरून उराशी
मजला तू माझ्या देशी?

स्वप्नांचे बांधून इमले
दूरदेशी मला तू आणले
दिवसांचे महीने झाले
महिन्यांचे वर्षही सरले

ढग जसे बिलगूनी असती, 
सदैव तुझ्या अंगाशी, 
पैशांची हिरवी मस्ती
खोल माझ्या मनाशी

भवितव्याची चिंता खाशी
अन् माझी भूक अधाशी
मन माझे माझ्या देशी पण
पाय भक्कम विदेशी

"दररोज मी तुझ्या अंतरंगातून 
उडणारी विमाने पाहतो;
आणि विचार करतो की एक दिवस...
एक दिवस, मी सुद्धा असाच 
एखाद्या विमानात बसून
तुझ्याच नाकावर टिच्चून
भुर्रकन मायदेशी परतेन
पण....
पण निळा रंग जसा तुझी पाठ सोडत नाहीत
तशी ही डॉलर पौंड्सची, 
ऐशो-आरामाची नशा, 
अनाकलनीय भविष्याबद्दलचे, 
पोरांच्या फियांचे, म्हातारपणाचे
तणाव काही गाशा गुण्डाळत नाहीत...

म्हणुनच परत तुलाच विचारतो मी,
नेशील का धरून उराशी
मजला तू माझ्या देशी?"

Thursday, April 3, 2014

पावसातले मृगजळ

आजुबाजुला पाउस पडत होता
अंगाला थंड वारा झोंबत होता
पण मनाचा पांथस्थ, वाळवंटात
जणु तुला शोधत होता

विजांचा कडकडाट होता
ढगांचा गडगडाट होता
पण मनात मात्र माझ्या एकांताचा
करूण आकांत होता

थेंबांचा वर्षाव होता
मृदगंधाचा फाया होता
पण मनात मात्र तुझ्या अबोलीचा
घमघमणारा सुगंध होता

सृष्टीला हिरवा साज होता
आभाळात इंद्राचा चाप होता
पण मनातल्या मस्र्स्थळावर
तुझा आठव गहिरा होता

पावसाचा भर ओसरला होता
पण तुझ्यासाठी तहानलेला माझा जीव,
डोळ्यातल्या पाण्यात
तुझे मृगजळ शोधत होता...

Sunday, March 2, 2014

असा एक दिवस असावा...

माझी सुखाची आणि आनंदाची कल्पना एकदम साधी, सोप्पी (आणि बरीचशी आळसावलेली) आहे. माझे असे जगण्याचे स्वप्न आहे...

सकाळी पक्षांच्या चिवचिवण्याने जाग यावी. उशिरा नव्हे पण जास्त लौकर पण नव्हे. उजाडलेले असावे पण लख्ख ऊन नसावे. घराच्या आंगणात एका आरामखुर्चीत आरामात बसून गरमा-गरम, वाफाळलेला आले घातलेला बायकोच्या हातचा चहा प्यावा. बरोबरीला मस्त कुरकुरीत खारी असावी. चहा पिताना पेपर चाळावा (जो साधारणपणे १० मिनिटात वाचून होतो) नंतर बाजूच्याच टेबलावर पडलेलं माझ्या आवडीचे कोणतेतरी पुस्तक उचलून वाचावे, एखादी छानदार कविता वाचावी. हवेत गारवा असावा पण थंडी नाही. चहा झाल्यावर अशीच एक अंगणात चक्कर मारावी, किंवा तसेच आराम खुर्चीत बसून बाजुला पडलेल पेन आणि पेपर उचलावे. मनातले काही शब्द पानावर टिपावेत, हातून काही अर्थगर्भ लिहिले जावे. वाचन आणि लेखनात १-२-३ तास कसे जावेत हे कळुच नये. नंतर आजूबाजूला सहज बघत बसावे.उन्हें वर आलेली असावीत. मग घरात एक चक्कर टाकावी. बायाकोबरोबर गुजगोष्टी व्हाव्यात. आई बाबांबरोबर चार गप्पा व्हाव्यात. तोपर्यंत जेवणाची वेळ व्हावी. मस्त गरमागरम जेवण व्हावे. वरण भात, कटाची आमटी, मऊ गरम पोळ्या, कारले-तोंडले-वांगे सोडून कुठलीही भाजी असावी. मटर पनीर असेल तर उत्तम. आंब्याच्या सीजनला मस्त थंड हप्पूस आंब्याचा आमरस वर साजूक तूप. जेवणानन्तर शतपावली आणि नन्तर एका अर्ध्या तासाची वामकुक्षी. दुपारचे उठावे आणि म्यूजिक सिस्टम वर सुंदर गाणी ऐकत बसावे, किंवा बासरीचे सुर ऐकत डोळे मिटून हरवून जावे.  सन्ध्याकाळचा चहा पुढ्यात यावा. चहाचे घोट घेता घेता घराच्यान्शी गप्पा. संध्याकाळी घराबाहेर फिरायला पडावे. मित्र मंडळाला भेट द्यावी. शिव्या घालत घालत जुन्या गोष्टी आठवत आठवत हसावे, काही क्षण डोळ्यांत पाणी यावे. उन्हें परतलेली असावीत तेव्हा मन कातरवेडे व्हावे म्हणजे त्या कातरवेळी मन अस्वस्थ व्हावे आणि त्या क्षणी काहीतरी भन्नाट सुचावे, समोर कागद पेन असावे त्यावर सर सर ते विचार उतरवून काढावेत. मन मोकळे झाल्यावर मुसळधार पावसानन्तर आकाश जसे स्वच्छ होते तसे वाटावे. रात्री साधे जेवण असावे, खिचड़ी किंवा तसेच काहीतरी. जेवणानन्तर ताक पिउन अंगणात असलेल्या पलंगावर पडावे, अथांग आकाश आणि लुकलुकणारे आकाशातले तारे बघत...

Sunday, January 19, 2014

आशेचा आशीर्वाद

देवा,
देणारच असशील मला काही तर दे 'आशेचा' आशीर्वाद
जो दाखवेल मला भविष्यातील भव्यता,
ज्यामुळे विसरेन मी भुतकाळातील भूतं,
आणि कदाचित होइन वर्तमानावर वरताण मी.
जो भरेल माझ्या जखमी स्वप्न-पंखांत स्वत्व
आणि भेगाळलेल्या तळपायात त्राण
जो दाखवेल मला अंधाराचा अंत
आणि होणार्या सुर्योदयाचा स्वर्ग...

Monday, November 18, 2013

तुझी आठवण

तू आसपास नसताना,
संध्याकाळ ही पोकळ होते.
तुज आठव गहिरा होतो,
मन डोह सावळा होते...

विरहाच्या कातरवेळी,
सुचतात तुझी मज गाणी.
आठवणींचा किनारा शोधी,
डोळ्यांतील खारे पाणी...

Friday, August 30, 2013

तो माणुस कसला

जो पोट धरून नाही हसला
तो माणुस कसला?
जो मन भरून नाही रडला
तो माणुस कसला?
जो मित्रांबरोबर कट्ट्यावर नाही बसला
तो माणुस कसला?
जो मैत्रिणीला चोरून बागेत नाही भेटला
तो माणुस कसला?
जो गर्दीत नाही हरवला
तो माणुस कसला?
त्याच गर्दीत जो एकटा नाही पडला
तो माणुस कसला?
जो आयुष्यात एकदाही नाही फसला
तो माणुस कसला?
जो कधीही नाही खचला
तो माणुस कसला?
जो तावून सुलाखून नाही घडला
तो माणुस कसला?
जो संकटांना एकटा नाही नडला
तो माणुस कसला?
आणि जो माणुस नाही बनू शकला
तो माणुस कसला?

Thursday, August 15, 2013

हा झंझावात कुणाचा मज कधीच कळले नाही

त्या कोमल प्रेम-क्षणांची
भावनात गुंफण झाली
शब्दांच्या अर्थाचीही
डोळ्यात बाहुली झाली

काय झालो माझा मीही
मज मजला उमजले नाही
गतस्मृतींची उजळण झाली
हे काय कमी नाही?

त्या उत्कट भावनांच्या
खळखळणाऱ्या फेनिल लाटा
वादळात हिन्द्कळणाऱ्या
माझ्या मनातील नावा

माझा माझ्यावरती
कसला ताबा उरला नाही
मी तुला दुखवले ह्याचे
पळभरही विस्मरण नाही

आता शोधू कुठे कश्या ह्या
व्युहातील प्रकाश वाटा
अंधाराच्या गर्भामधुनी
आता माझी सुटका नाही

वागलो चुकीचा जरी मी
तुजला दुखावायाचा हेतु नव्हता
हा झंझावात कुणाचा
मज कधीच कळले नाही...

Thursday, May 30, 2013

एका रसिकाची साधना

मला संगीतातले फारसे कळत नाही, पण संगीतातून आनंद शोधत जाणारा एक प्रवासी, रसिक म्हणून मी माझे विचार मांडू इछितो. 

माझे पहिल्यापासूनच सुरांपेक्षा शब्दांवर जरा जास्तच प्रेम राहिले आहे. पण जसजसा मी जास्तीत जास्त संगीत ऐकत आहे, तसतसा माझा दृष्टीकोन बदलत चालला आहे.

माझ्या मते, गाण्यातील शब्द ऐकणे म्हणजे एका अर्थी 'सगुणोपासना' आहे आणि सूर ऐकणे म्हणजे 'निर्गुणोपासना' आहे. शब्द ऐकताना आपल्या समोर शब्दांतून कवीच्या भावना मूर्त होतात, पण जेव्हा गायक कोणतेही सूर प्रकट करतो, तेव्हा त्या सुरात रसिकाला भावना आपल्या आपण शोधाव्या लागतात. जसे सगुणोपासनेत दैवी शक्तीला एक 'आकार' दिलेला असतो त्या प्रमाणे शब्द भावनेला आकार देण्याचे काम करतात. पण सुरांमध्ये भावना शोधताना त्या अमूर्त स्वरूपात शोधाव्या लागतात, अदृश्यातून दृश्य कराव्या लागतात. 

हाच मुद्दा थोडा पुढे नेला तर असे जाणवेल कि त्यामुळेच जेव्हा स्वरांचा संबंध असतो तेव्हा शब्दांची गरज भासत नाही. कोणताही वादक मग कोणतेही वाद्य वाजवत असतो, मग ते वाद्य भारतीय असो कि परदेशी, त्यातून निघणारे स्वर मनाची एक तार वाजवून जातात आणि तुम्हाला शब्दांची गरज भासत नाही. तुम्ही तेथे अमूर्त भावना बघत असता, तेथे तुम्हाला कोणत्याही 'मूर्तीची' गरज भासत नाही. 

पण ह्याचा अर्थ असा नाही की सगुणोपासना करूच नये, किंवा शब्दांना काहीच महत्व नाहीये. माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार,  जसे बालपणाशिवय मोठेपण येऊ शकत नाही तसे सगुणोपासना केल्याशिवाय निर्गुणोपासना होऊच शकत नाही. संगीत समजण्याचा हा एक प्रवासच आहे असे मी समजतो. आणि हा एक न संपणारा प्रवास आहे. आत्ता कुठे मला सुरांचा आनंद घेण्याची थोडी थोडी सवय होत आहे. ही एका प्रकारची साधनाच आहे- रसिकाची साधना...

Monday, April 22, 2013

लाज

माझी मलाच आता लाज वाटते आहे,
पेटून उठणे आता माझे रक्त विसरले आहे...

अजुनी धगधगणाऱ्या चितांवर हळहळतो मी,
दुसऱ्याच क्षणी मग माझा, माझ्यातच गुरफटतो मी...

जगण्याचे खोटे-खोटे इमले चढवतो मी,
दुसऱ्यांच्या दुःखावरती सुख आपले बांधतो मी...

दुसऱ्यांच्या रण-संग्रमाशी माझे देणे-घेणे नाही,
बातम्या बघताना खवळतो, पण मी रस्त्यात उतरत नाही...

माझी मलाच आता लाज वाटते आहे,
पेटून उठणे आता माझे रक्त विसरले आहे...