Sunday, February 26, 2012

मराठी भाषा दिनानिमित्त माझ्या मातृभाषेला माझा मनाचा मुजरा..



मराठी भाषेच्या लवचिकतेचे काही नमुने:

१. 
बघा-बाई म्या उगवताच रवीला
दाट घालुनी दधी चरवीला
त्यात गे घुसळताच रवीला
सार काढुनी हरी चरविला

या चार ओळीपैकी पहिल्या ओळीतील रवीचा अर्थ `सुर्य' असा आहे. दुसऱ्या ओळीतील चरवी हे `भांडे,' तिसऱ्या ओळीतील रवी म्हणजे `दही घुसळण्याच उपकरण' आणि चौथ्या ओळीतील `चरविला' या अर्थ आहे `खाऊ घातला'.


२.
रामासा त्या गावे! भजन करावे गाढ वाचे
रामासा त्या गावे! भजन करावे गाढवाचे


३.
लाकडाचा एक तुकडा जर गोठ्यात ठोकला तर त्याचा 'खुंट' होतो, तोच जर जात्यात ठोकला तर 'खुंटा' होतो आणि जर भिंतीत ठोकला तर त्याचीच 'खुंटी' होते. 



आणि आता आपल्या मराठी बद्दलच्या काही अप्रतिम कविता:

१. 

माझा मऱ्हाटीचि बोलु कवतुके परी अमृतातेही पैजेसी जिंके ॥ 

- ज्ञानेश्वर  

 

२.  

मराठी असे आमुची मायबोली । 

नसो आज ती राजभाषा नसे ॥

नसो आज ऐश्वर्य या माउलीला ।

यशाची पुढे दिव्य आशा असे ॥

- माधव-ज्युलियन

 

३. लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी


आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी


आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी


आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी


येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी


येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी


पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपूल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदान्द तख्त फोडते मराठी



- सुरेश भट

Thursday, January 26, 2012

कशास देता खुळे आम्हाला

कशास देता खुळे आम्हाला जाती-धर्माची?
चातुर्वरणाची किंवा देऊळ मशिदींची?


अभिमान असावा स्व-धर्माचा,
पण वृथा दुराभिमान नको,
पर-धर्मावर प्रेम करावे,
माणुसकीचे भान असो...

कशास देता खुळे आम्हाला देश तोडण्याची?
स्वतंत्र राज्याची अथवा भाषावार प्रांताची?

स्व-प्रांतावर प्रेम असावे,
पण दुसऱ्याचा द्वेष नको,
आपण सारे भारतीयच,
ह्या गोष्टीचे भान असो...

Monday, December 5, 2011

रुटीनच्या नानाची टांग

सकाळी उठुनी कचेरीस जावे |
संध्याकाळी गर्दीतुनी परतावे ||
अशा दिनचर्येला काय म्हणावे |
कैदेतुनी ह्या कसे मुक्त व्हावे || १ ||


|| जय जय रघुवीर समर्थ ||

मनाच्या तळाशी दडून बसलेला,
एक आवाज हळूच उमटला.
म्हणाला कर एक गोष्ट 'उटपटांग',
तुझ्या फालतू रुटीनच्या नानाची टांग.

मार दांडी एक दिवस ऑफिसला,
मस्त निरर्थक फिरून बघ एकदा.
Laptop-Mobile जा थोड्यावेळ विसरून,
Emails-Meetings काय करायचे हे आठवून?
पावसात मस्त भिजून घे,
मनातले गाणे गाऊन घे.
वेडे होऊन शहाणपणा कर,
नाहीतर ह्या गर्दीतच मर.
कृपा करून Internet चे नाव नको काढूस,
हर एक मिनिटाला Facebook नको पाहूस.
जुन्या आठवणीत हरवून जा,
दोस्त मंडळीत जरा गुंगून जा.
जुनी पत्रे, काही कविता, काही पुस्तके वाच,
थोड्यावेळ स्वतःला विसरून नाच.
रोज जे करतोस ते नको करूस,
लोकांच्या चिंता तू नको वाहूस.

ऑफिस ते घर अन घर ते ऑफिस पुरे झाले आता,
बिलकुल नको मारूस ह्या Busy रुटीनच्या बाता.
तूच काय तो तुझ्या रुटीनचा उपयोग सांग,
म्हणूनच म्हणतो तुझ्या रुटीनच्या नानाची टांग...

मना सज्जना मागणे हेची आता |
जुनी 'दीन'चर्या नको पाळू आता ||
मना सज्जना बंधने तोड आता |
मना सज्जना मुक्तता भोग आता || २ ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Sunday, November 6, 2011

एक चतुर्थांश चक्रव्यूह

पंचविशी पार केली कि बहुतेक सर्वांच्या आयुष्यात असा काळ येतो कि तुम्ही गर्दी बरोबर असता पण तरीही एकटे असता. तुम्हाला अशी जाणीव होऊ लागते कि आता आपली स्वतःची ओळख होणे गरजेचे आहे. मी कोण आहे, माझा ह्या भूतलावरचा ‘उद्देश’ काय आहे असे प्रश्न सतावू लागतात तुम्हाला. 

आजू-बाजूच्या स्वार्थी लांडग्यांची ओळख तुम्हाला अस्वस्थ करून सोडते. आयुष्यातले जे क्षण वाळूसारखे तुमच्या हातातून निसटून गेले आहेत त्यांच्या आठवणीनी मन घायाळ होऊ लागते. ज्या व्यक्ती तुमच्या पासून दूर गेल्या आहेत त्यांच्याशी तुम्ही केलेल्या प्रतारणेचे सुद्धा चटके बसू लागतात मनाला.

तुम्ही तुमच्या नोकरीकडे बघता आणि तुम्हाला वाटू लागते कि हेच हवे होते का मला आयुष्यात? असेच काम करायचे होते का मला? नोकरीतील स्वारस्य पण हळूहळू कमी होऊ लागते. पण आतापर्यंत तुम्ही आयुष्याच्या स्पर्धेचा अविभाज्य घटक बनलेले असता. नोकरी सोडून काय करायचे हे भय तोपर्यंत मनात ठाण मांडून बसलेले असतेच. भीती डोळ्यावरची पट्टी काढूच देत नाही.

शाळा-कॉलेज मधली तुमची मस्ती आठवणी बनून मनाला छळू लागते, डोळ्याच्या कडा ओलावू लागते. काळाचे घड्याळ मागे फिरवून परत बालपणीचे अबोध निरागस दिवस परत आणावेत असे वाटू लागते.
तुमचा स्वतःचा शोध सुरूच असतो, रात्रीच्या अंधारात सुधा डोळे टक्क उघडे असतात, आणि मन विचारांच्या जंजाळात. आपल्या सीमचे काटेरी कुंपण आपल्यालाच टोचू लागते. तुमचे मन आशा-निराशेच्या तराजूत हिंदकाळू लागते.

पैशासाठी विकलेल्या, उराशी जपलेल्या पंखांच्या पाठीवरील जखमा अजूनच ठस-ठसू लागतात. 

घराची, आई-बाबांची, आजी-आजोबांचं, भावंडांची आणि नातेवाईकांची अनिवार ओढ वाटू लागते. परंतु पुढच्याच क्षणी, ते आपल्याला कधी न कधी सोडून जाणारा आहेत ह्याची चिंता चीतेसारखी जाळू लागते. एकटे एकटे वाटून, कातरवेळी मनाची अवस्था विचारधारात हरवलेल्या वेड्या पाखरा सारखी होते…

प्रश्न तर हजारो असतात पण उत्तरे अनुत्तरीत राहतात. आपण आयुष्याच्या चाक्रव्युहातील अभिमन्यू झाल्याची तीव्र जाणीव होऊ लागते आणि ह्यातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याची जाणीव शक्तिहीन करून टाकते. हाच तो एक चतुर्थांश चक्रव्यूह…

Friday, October 14, 2011

मी असा

धुंद मला ना मद्याची, 
ही तर आहे गद्या -पद्याची...

भूक मला ना खाण्याची, 
ही तर सुंदर गाण्याची...

भीती मला ना मरण्याची, 
पण भाव मनातील सरण्याची...

वेड मला ना द्रव्याचे, 
हे तर मुग्ध काव्याचे...

मोहिनी ना मला मोहिनीची, 
ही तर वर्षाधारांची...

भूल मला ना नोटांची, 
ही तर वेड्या बेटांची...

ओढ मला ना फिरण्याची, 
पण फिरताना शब्दांना भेटण्याची... 

संध्याकाळ

आयुष्याच्या संध्याकाळी डोळ्यांमधले थिजले आसू,
पायांमधले त्राण सरले अन ओठांवरले विरले हासू...

अश्रूंच्या कोमट पाण्याने पत्रातील शाई भिजली,
डोळ्यांपुढली अक्षरे दुःखाच्या धुक्यात विरली...

मनातले कढ, आवेग आवरून आवरून निशब्द होत गेले,
मारून टाकलेल्या भावनांमुळे मन सुन्न होत गेले..

हातातून निसटून गेलेल्या क्षणांची आठवण अस्वस्थ करत आहे,
ह्या कातरवेळी मन मावळत्या सूर्यासारखे अंधारामध्ये बुडत आहे...

आयुष्याच्या संध्याकाळी डोळ्यांमधले थिजले आसू,
पायांमधले त्राण सरले अन ओठांवरले विरले हासू...

पुन्हा पाउस

भेटलो आज पावसाला बऱ्याच दिवसांनी,
केल्या काही गुज-गोष्टी बऱ्याच दिवसांनी.

जुन्या मित्राच्या जुन्या आठवणी, भेटल्या पुन्हा नव्या होऊनी,
भेटल्या त्या पावसाच्या सारी अन गेल्या पुन्हा भिजवूनी.

पुन्हा पाउस घेऊन आला आठवांच्या सरी,
वर्षू लागल्या आसवांच्या धारा पुन्हा भुईवरी.

जुने दिवस, जुने क्षण पुन्हा झाले नवे,
भर पावसात, थेंबांच्या धारात मन पण होई ओले.

ढगाळ कुंद हवा आणि मातीचा सुवास,
तुझे ते शब्द, "अशा वेळी तू जवळ हवास..."

असे का मनाचे पावसाशी नाते,
क्षणामध्ये वाटू लागते जग रिते-रिते.

पावसाला मित्र मानू की मानू माझा शत्रू,
डोळ्यात थेंबांच्या सरी देतो, पण कविता लागते पाझरू.

Monday, August 22, 2011

कसले काय, आमचे तर मातीचे पाय...

रस्त्यावरून जाताना इतरांना शिव्या घालू, 
रस्ता मोकळा मिळाला तर  स्वतःही तशीच गाडी चालवू,
पण कोणाचा अपघात झाला तर मदत मात्र करायची नाय,
कसले काय, आमचे तर मातीचे पाय...

ऑफिस मध्ये  बॉस चे सगळे ऐकू,
कितीही शिव्या घातल्या तरी शेवटी पायात शेपूट घालू,
उलटे बोलायची हिम्मतच नाय,
कसले काय, आमचे तर मातीचे पाय...

सकाळचा पेपर चहा बरोबर चवीने वाचू,
त्यातल्या घोटाळ्यांवर झोरदार चर्चा पण  झाडू,
पण कोणाविरुद्ध आवाज उठवायचा नाय,
कसले काय, आमचे तर मातीचे पाय... 

दुसऱ्याबद्दल मोठ्या आवडीने बोलू,
लोकांच्या पाठीमागे त्यांच्याच उखाळ्या-पाखाळ्या काढू,
पण  कोणाला मोठ्या मनाने मदत करायची नाय,
कसले काय, आमचे तर मातीचे पाय...

आपल्या पुरते जगू आणि 
आपल्यासाठीच मरू,
पण कोण दुसऱ्याला जगवायची इच्छा नाय ,
कसले काय, आमचे तर मातीचे पाय...

इतरांना त्रास देऊ आणि 
त्यांना पुरते छळू,
पण कोणाला खुल्या दिलाने दाद द्यायची नाय,
कसले काय, आमचे तर मातीचे पाय...

आजू-बाजूच्या सगळ्या समस्या बघू,
सोयीस्कररित्या त्यांच्याकडे कानाडोळा करू,
पण निधड्या छातीवर संकटे झेलत निस्वार्थ समाजसेवा करायची नाय,
कसले काय, आमचे तर मातीचे पाय...

सोमवार ते शुक्रवार आणि,
ऑफिस ते घर-दार,
ह्याच्यावर आयुष्य जगायचेच नाय,
कसले काय, आमचे तर मातीचे पाय...

देव-देव करू आणि,
पैशावर त्याला विकत घेऊ,
पण आपल्या हिमतीवर एक पाऊल टाकायचे नाय,
देवा परमेश्वरा, कसले काय, आमचे तर मातीचे पाय...

Wednesday, June 15, 2011

तू आणि चंद्र...

तुझे केस, 
होती चिंब, 
चांदण्याच्या थेंबात...

तुझे नयन, 
होती गगन, 
चंद्राच्या प्रकाशात...

तुझी खळी, 
भरे सगळी, 
चांदण्याच्या धुक्यात...

तुझ्या भाळी, 
उतरू येई, 
आकाशीची चंद्रकोर...

Friday, June 3, 2011

Best Friend

मला वाटायचं तिचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे,
फक्त मी विचारायची देर आहे.
मलाही ती प्रचंड आवडायची,
जेव्हा ती मला आपला
'Best Friend' म्हणायची.
मनातलं गुपित फोडायची,
लाडात येऊन बोलायची,
लटके रागवायची,
माझ्याशी भांडायची.
गप्पा मारायची,
माझ्या कविता ऐकायची.
त्यांना उत्स्फूर्त दाद द्यायची,
माझ्यावर प्रेम करायची...


पण मला माहित नव्हतं की ती मला,
फक्त आपला 'Best Friend' मानायची...

मला खूप यातना झाल्या जेव्हा ती म्हणाली,
"मी प्रेमात पडले आहे रे त्याच्या...",
पण तिच्या अपेक्षेप्रमाणेच मी तिची थट्टा केली,
अन तिची कळी लगेचच खुलवली,
तिला काय सांगू काय नको झालेलं,
असा तिला मी कितीदा तरी पाहिलेलं.
मी म्हणालो, "मजा आहे बाबा एका मुलीची..."
ती म्हणाली,"तुला पण मिळेल रे साथ कोण सुंदरीची",
मन रडत असतानाही हसत होतो,
तिला कळू ना देण्याची सगळी काळजी घेत होतो.
तिला पण काहीच कळलं नाही,
प्रेमात पडलेल्या तिला काहीच वेगळा दिसला नाही...

मी पण तसदी घेतली नाही मनातलं काही बोलायची,
कारण ती मला आपला 'Best Friend' मानायची...

ती गेल्यावर मी सुन्न झालो,
आतल्या आत मग्न झालो.
तिच्या आठवणी आठवू लागलो,
त्या पुसून टाकायचा निष्फळ प्रयत्न करू लागलो.
तिच्याशी बोलताना मी तिची खूप थट्टा करायचो,
'त्याच्या' नावाने तिला भरपूर चिडवायचो.
त्याच्याशी भांडल्यावर मात्र तिला माझी आठवण यायची,
आजही माझ्या मध्यस्थीची तिला गरज वाटायची.
पण ती अजूनही माझ्याशी खूप बोलायची,
खूप काही सांगायचय म्हणायची.
तुला भेटायचं असे म्हणायची,
पण 'कधी' हे मात्र सांगायला विसरायची...

मनातले अश्रू मी तिला कधीच दिसू दिले नाहीत,
कारण ती मला तिचा 'Best Friend' मानायची

मी मात्र आतल्याआत कुढत बसायचो,
माझ्याच एकटेपणात हरवलेला असायचो.
तिचे बोलणे ऐकत असताना,
मूकपणे आपले अश्रू गिळत असायचो.
तिच्यासमोर नाटक करणे फारच कठीण होते,
कारण माझे मनन अजून तिच्याकडे गहाण होते.
त्याचं-तिचं भांडण ती मला येऊन सांगायची,
माझ्याशी बोलून मोकळा वाटला असा म्हणायची.
स्वतःच्या वेदना लपवून तिचे बोलणे मी शांतपणे ऐकून घ्यायचो,
एक दोन गोष्टी सांगून तिला बरे वाटावे असे काहीतरी करायचो.

माझ्या 'बोलण्यापेक्षा' माझ्या 'असण्यावरच' ती समाधानी असायची,
कारण ती मला तिचा 'Best Friend' मानायची...

अधेमध्ये तिलापण काहीबाही हुक्की यायची,
कोणाच्याही नावावरून मला ती चिडवून पहायची.
मीही हसून खोटा राग दाखवायचो,
तिच्या चिडवण्यावर  खोटे खोटे चिडून तिला खुश करायचो.
माझ्या वेदना आणि दुःख तिला कधीच दाखवले नाही,
एका शब्दानेही मी तिला काही कळू दिले नाही.
त्या दिवशी त्याची आणि माझी भेट झाली,
माझी ठसठसणारी जखम पुन्हा उघडी पडली.
तिने माझी ओळख चांगला मित्र म्हणून करून दिली.
मी भेट दिलेल्या माझ्या कवितांची वही त्याला दाखवली.
दुसऱ्याच दिवशी त्याने तिला आपली कविता भेट दिली,
कारण त्याला कदाचित तिच्याबद्दल असुरक्षितता भासली.

तिला मात्र कधीच ह्याची भीती नाही वाटायची,
कारण ती मला फक्त स्वतःचा 'Best Friend' मानायची...

तिच्या लग्नामध्ये तिने मला आवर्जून बोलावले,
"लग्नाला नक्की यायचे" असे पत्रिकेत लिहून पाठवले.
माझ्या हृदयाची शकले मीच गोळा केली,
एक तिच्या आवडीची गिफ्ट घेऊन तिला भेट दिली.
चेहरा हासरा ठेऊन मी काळजी घेतली तिला खुश ठेवायची,
कारण ती मला तिचा 'Best Friend' मानायची...

तिच्या लग्न नंतर मात्र मी एक गोष्ट केली,
कटाक्षाने तिची भेट टाळली.
माझ्या वागण्यातला फरक तिला कळू द्यायची माझी तयारी नव्हती,
कारण त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या तिला,
माझ्या आसवांची मुळीच कदर  नव्हती,
मी इतके दिवस असे काहीच दाखवले नाही,
कारण ती मला फक्त स्वतःचा 'Best Friend' मानायची...

आयुष्यभर एकटे राहून जगात आलो,
तिच्या पात्रांना जाणून-बुजून एक-दोन ओळीत उत्तरे लिहू लागलो.
माझ्या 'busy Life' चांगला बहाणा माझ्याकडे होता,
तिच्याही व्यापांमुळे तिला अजिबात वेळ नव्हता.
तरीपण माझ्या एक-दोन ओळींना ती आवर्जून उत्तर पाठवायची,
कारण ती मला तिचा 'Best Friend' मानायची...

तिच्या अखेरच्या खाणी मी तिला भेटलो,
इतके दिवस थामावालेल्या अश्रुंसकट तिच्याशी बोललो.
शेवटच्या घटका मोजताना तिला फार बोलावले नाही,
मलाही तिथे जास्त वेळ थमावले नाही.
तरीही एका वाक्यात तिने मला सांगितले,
"तू आतापर्यंत खरे मित्रत्व दाखवले"
डोळ्यानीच ती म्हणायचे ते म्हणाली,
ती मला तिचा 'Best Friend' मानायची...

आता माझाही प्रवास संपत आला आहे,
मागे वळून बघताना त्या हिरवळीचा आता हेवा वाटत आहे,
आताच पोस्टमन येऊन हे parcel देऊन गेला,
माझ्या मनात प्रश्नांचे काहूर माजवून गेला.
काय गरज होती का तिला तिच्या मृत्युपत्रात
आवर्जून माझ्यासाठी काही ठेवायची?
पण नाही, कारण...
ती मला तिचा 'Best Friend' मानायची...

तिच्या डायऱ्यामध्ये मला सापडले,
माझे हरवलेले क्षण, आठवणी,
खोड्या, थट्टा, हसणे, बोलणे, रडणे,
गुपिते, गोष्टी, गाठी-भेटी.
मैत्री आणि बराच काही...
आणि पटत गेले कि,
खरच ती मला तिचा 'Best Friend' मानायची...

जेव्हा शेवटच्या पानावरच्या तिच्या ओळी वाचल्या,
हृदयातल्या अश्रूंना जणू वाट मोकळ्या झाल्या.
"मला वाटतंय त्याचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे,
फक्त त्याने मला विचारायची देर आहे.
मला तर तो प्रचंड आवडतो,
मी त्याला
'Best Friend' म्हटल्यावर,
गालातल्या गालात हसतो.
मनातलं गुपित फोडतो, माझे सगळे ऐकतो,
माझ्याशी भांडतो,
त्याच्या कविता ऐकवून माझ्याकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकतो,
माझ्यावर प्रेम करतो...
खरच का तो माझ्यावर प्रेम करतो???"


जणू माझ्याच ओळी मी तिच्या डायरीत वाचत होतो,
मारण्यापूर्वीच सरणावर जळत होतो.
काय गरज होती मरणशय्येवर
नियातीनेही माझी अशी क्रूर थट्टा करायची?
त्या शेवटच्या क्षणी मला जाणवून द्यायची कि,
"वेड्या, तू तुला तिचं 'खरं प्रेम' मानायची...