Friday, July 23, 2010

पाउलखुणा

रातराणीच्या सुगंधाबरोबर तुझी आठवण आली,
मनाच्या कोपऱ्यातून तू अवचित समोर आलीस.
इतके दिवस तुला जणू विसरलो होतो,
पूर्वीपेक्षा आनंदात राहायच्या प्रयत्नात होतो,

पण,

रातराणीच्या सुगंधाबरोबर तुझी आठवण आली,
मनाच्या कोपऱ्यातून तू अवचित समोर आलीस.
अशीच अचानक पावसाची सर आली,
माझ्या मनाला चिंब भिजवून गेली.
तुझ्या बरोबर भिजलेलो हे आठवले,
आणि मुसळधार पावसात एकाच झाडाखाली थांबलेले आठवले,
तसच भिजल्यावर पोटभर खाल्लेले आठवले,
मला सोडून जाताना तुझे बावरलेले ध्यान आठवले
नुसते ढग दाटून आले तरी मला तुझी आठवण येते,
पाऊस पडू लागला की तू माझ्या समोर उभी राहतेस.

कशाला अजून माझ्या मनात दडली आहेस?
आणि अशी अधे मध्ये मला त्रास देते आहेस?
तू जाताना सगळे घेऊन गेली होतीस,
मला काय माहित होते की,
वाटेवर तुझ्या पाउलखुणा ठेवणार होतीस...

पावसात रडत बसू नकोस

पावसात रडत बसू नकोस, पावसात कुढत बसू नकोस,
पावसात कष्टी होऊ नकोस, पावसात दुख्खी होऊ नकोस.

प्रत्येक पाऊस असा झेलून घे चेहऱ्यावर,
थेंब अन थेंब मुरून जाऊ दे तुझ्या उघड्या निधड्या छातीवर.

पण त्याला कोरडा परत जाऊ देऊ नकोस,
तुझ्या अश्रुंचे पाणी दे त्याला आणि देऊन टाक त्याला तुझी दुख्खे.

घेऊन जाऊ दे ते सगळे त्याला कोठेतरी दूर,
बरसून बरसून तोही होईल मोकळा, आणि तू ही होशील मोकळा... ओला चिंब...

तरंग

पावसात भिजल्यावर मनाचा रंग उडतो,
पोपडे निघालेल्या भिंतीसारखा पाउस मन उघडे करतो.
काळाने झाकलेल्या जखमा परत ताज्या होतात,
ठसठसणाऱ्या आठवणी पुन्हा पुन्हा उठतात.
तुझ्याबरोबर पावसात घालवलेले काही क्षण,
मनात तरंग उठवतात, पण...
मन शांत व्हायला पाऊस थांबायची वाट बघतात!!!

अन ती गेली...

पावसाची चाहूल,
मनात काहूर,
ढगांची दाटी,
आठवणीतल्या भेटी,
मातीचा वास,
तिचाच भास.

सरींच्या लाटा,
वाऱ्याच्या वाटा,
ढगांच्या होड्या,
विजांच्या शिड्या,
धुक्याचा फेटा,
डोंगराच्या माथा.

जुना पाऊस,
जुना मित्र,
दर वर्षी,
निमित्तमात्र,
घेऊन येतो,
तिचे पत्र.

धरती भिजली,
आसवे थिजली,
एकाच ओळ,
मनात भिनली,
"येते मी",
अन ती गेली...

Wednesday, July 21, 2010

निसर्ग

निसर्ग सुंदर, मुग्ध, हासरा;
फुल-पानांमधुनी हसला.

निसर्ग रुसला, फुगला, रडला;
पाऊस होऊन बरसला.

निसर्ग चिडला, क्रोधीत झाला;
वादळ-विजेतून चमकला.

निसर्ग निजला, शांत जाहला;
उन होऊनी ढगात दिसला...

मुलांची दुनिया

तुला दिसते का रे आकाशातली परी?
शापाने काळी झालेली सुंदर राजकुमारी?

तुला दिसतो का रे तीन तोंडांचा राक्षस?
गूढ अंधाऱ्या किल्ल्याचा काळाभोर रक्षक?
तुला दिसतो का रे राजाचा उडता घोडा?
लंगड्या चेटकीचा तो तटबंदी वाडा?
दिसते का तुला राजकुमाराची लढाई?
ऐकू येते का सवाई थापाड्यांची एक से एक बढाई?

मला हे सग्गळे दिसते,
सग्गळे ऐकू येते.

तुला काय दिसणार आणि तुला काय ऐकू येणार?
तुझे डोके नेहमी सरळच धावणार

मुलांच्या गोष्टीत मोठ्यांचे काय काम?
अरे आमच्या मनाच्या जादूला इथे नसतो लगाम.

मुलांच्या राज्यात मुलांनीच यावे,
मोठ्यांनी आपले मोठ्ठेपण वेशीबाहेर विसरावे...

अज्ञात खोल निळाई...

अज्ञात खोल निळाईच्या शोधात काल रात्री मी प्रवास सुरु केला...मी कोण,कुठला, कुठे चाललो आहे, काय अस्तित्व आहे माझे, माझा इथे येण्याचा हेतू काय, असे आणि बरेच प्रश्न मनात थैमान घालू लागले. विचारांच्या वेड्या वादळात मी आपली नाव हाकत होतो. 'एकला चालो रे'. किती तरी विचार मनाची पोकळी भरून काढत होते. माणूस विचारच का करतो? मुळात माणसाला विचार करायला डोके आणि मनच का असते? जर स्वतःचाच विचार करणारे मन असेल, तर जनावरांना लागणाऱ्या भुकेत आणि आपल्या भुकेत अंतर ते काय? अधांतरी त्रिशंकू सारखे तरंगत आहोत आपण. ना पूर्णपणे जनावरांसारखे जंगली झालो आहोत, ना देवासारखे उदात्त... माणूस असल्याबद्दल हसावे कि रडावे मग? दुसऱ्याचे दुक्ख बघून जो पाझरतच नाही, त्याच्या सारख्यात आणि सह्याद्रीच्या कातळात फरक तो काय? तो कातळ पावसाळ्यात हिरवळतो तरी, पण माणूस हा दुसऱ्याच्या अश्रुपातातही आपला स्वार्थच बघतो...

Friday, July 16, 2010

मोती

मी तुझ्या डोळ्यांत बघावे,
तू माझ्या डोळ्यांत 'तुला' बघावे.

श्वासांचा संगम व्हावा,
गालांचा स्पर्श व्हावा.

ओठांची थरथर व्हावी,
बोटांची गुन्फण व्हावी.

शब्दांनी मूक व्हावे
भावनांनी मुक्त व्हावे

असे एकमेकांत झिरपत जावे,
आणि मनाच्या तळाशी, शिंपल्यामध्ये मोती व्हावे...

तू अन् मी...

माझ्या हाताच्या तळव्यामध्ये मी तुझा चेहरा धरला,
तुझाही तळवा हळूच माझ्या केसांमध्ये फिरला.

डोळे गुंतून गेले, अन् शब्दही गोंधळले,
अशा अवस्थेमध्ये आपण तासन्तास घालवले.

एक अक्षरही न बोलता प्रेमगीत गात होतो,
भर उन्हात, भावनवेगाने चिंब न्हात होतो.

दोघांमधले अंतर सरले, दूर झाला दुरावा,
दोघांमधल्या एकरुपतेचा हा तर एक पुरावा.
 
माझ्या मिठीमधेही तू चुळबुळ केलीस,
मी मिठी घट्ट करावी म्हणूनच ही चाल खेळलीस.

मीही मग तुझ्या छातीवर डोके घुसळले,
तुही बाळाला बिलगावे तसे मला जवळ घेतलेस.

त्याच वेळी दूर क्षितिजावर नभ धरणीला भेटले,
अशा सांजवेळी माझ्या ओठांवर तुझे ओठ टेकले...

मिठी

हात तुझा हातात असावा,

शब्द नसावे ओठी,

काळही क्षणभर थबकावा,

अशी असावी मिठी...
 
 
हात तुझा केसात फिरावा,

धडधड व्हावी उरी,

भवनावेगही न आवरावा,

कोणे एके दुपारी...
 
 
हात तुझा गळ्यात पडावा,

थरथर व्हावी अधरी,

जणू उचंबळून याव्या,

फेनील सागरलहरी...


गाल तुझे ओंजळीत घ्यावे,

चुंबन द्यावे भाळी,

डोळ्यांनीच वदणारी असावी,

भाषा असली निराळी...