Saturday, April 21, 2012

लहानपणीचा पाऊस (लेख की कविता?)

आजचा प्रवास मी पावसाला वाहिला,
भर रस्त्यात पावसाच्या आठवणींचा सदा पडलेला पहिला

शाळेत असतानाचा पाऊस खेळण्यासाठीच यायचा,
म्हणूनच जेव्हा जेव्हा मला लहानपणीचा पाऊस आठवतो,
तेव्हा तेव्हा मी त्याच्या बरोबर खेताना आणि भिजतानाच दिसतो
घाण पाण्यात खेळताना, चिखलात उड्या मारताना...
पाठीवरच्या दप्तराचे ओझे तोच वाहायचा बहुतेक,
मग यायची पावसाळ्यातली सुट्टी,
पावसाने मिळवून दिलेली किंवा आपण होऊन शाळेला मारलेली बुट्टी...

आजचा प्रवास मी पावसाला वाहिला,
लहानपणीच्या आठवणीनी माझ्याभोवती मस्तपैकी घेर धरला...
माझ्या बरोबर पाऊस चिखलात खेळला,
नंतरचा ओरडाही माझ्याबरोबरच खाल्ला...

माझ्या बरोबर तो हुंदड-हुंदड हुंदडला,
शाळेला बुट्टी मारून माझ्या बरोबरच अंथरुणात लोळला,
म्हणूनच आजचा प्रवास मी पावसाला वाहिला...

Friday, March 2, 2012

पाऊस पडावा...

पाऊस पडावा रिमझिम रिमझिम,
त्यात सुटावा गंधित वारा
ओल्या रस्त्यांवारूनी फिरतो,
आठवणींचा तो ऋतू हिरवा.

पाऊस पडावा धोधो धोधो,
काही न दिसावे डोळ्यांपुढती.
जलधारांचा प्रचंड पडदा,
जणू तटाच्या उंचच भिंती.


पाऊस पडावा धुक्यामधुनी,
शुभ्र ढगांची गर्दी व्हावी,
ह्या धुक्यातच दडून जावी,
दूर-दूरची पर्वतराजी.


पाऊस पडावा उघडीप उघडीप,
पाण्यामध्ये ऊन वितळावे,
अन थेंबानी अवचित असे,
इंद्रधनुच्या पुढ्यात यावे.

पाऊस पडावा गर्जत गर्जत,
विजांविजातच भांडण व्हावे,
वादळ वाऱ्यानीच तेह्वा

ऋतूराजाचे स्वागत व्हावे

पाऊस पडावा भल्या पहाटे,
आणि क्षणभर त्याने थांबावे.
ह्या विश्रांतक्षणीच त्याने,
कमालदलावर मोती व्हावे...

Sunday, February 26, 2012

मराठी भाषा दिनानिमित्त माझ्या मातृभाषेला माझा मनाचा मुजरा..



मराठी भाषेच्या लवचिकतेचे काही नमुने:

१. 
बघा-बाई म्या उगवताच रवीला
दाट घालुनी दधी चरवीला
त्यात गे घुसळताच रवीला
सार काढुनी हरी चरविला

या चार ओळीपैकी पहिल्या ओळीतील रवीचा अर्थ `सुर्य' असा आहे. दुसऱ्या ओळीतील चरवी हे `भांडे,' तिसऱ्या ओळीतील रवी म्हणजे `दही घुसळण्याच उपकरण' आणि चौथ्या ओळीतील `चरविला' या अर्थ आहे `खाऊ घातला'.


२.
रामासा त्या गावे! भजन करावे गाढ वाचे
रामासा त्या गावे! भजन करावे गाढवाचे


३.
लाकडाचा एक तुकडा जर गोठ्यात ठोकला तर त्याचा 'खुंट' होतो, तोच जर जात्यात ठोकला तर 'खुंटा' होतो आणि जर भिंतीत ठोकला तर त्याचीच 'खुंटी' होते. 



आणि आता आपल्या मराठी बद्दलच्या काही अप्रतिम कविता:

१. 

माझा मऱ्हाटीचि बोलु कवतुके परी अमृतातेही पैजेसी जिंके ॥ 

- ज्ञानेश्वर  

 

२.  

मराठी असे आमुची मायबोली । 

नसो आज ती राजभाषा नसे ॥

नसो आज ऐश्वर्य या माउलीला ।

यशाची पुढे दिव्य आशा असे ॥

- माधव-ज्युलियन

 

३. लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी


आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी


आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी


आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी


येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी


येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी


पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपूल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदान्द तख्त फोडते मराठी



- सुरेश भट

Thursday, January 26, 2012

कशास देता खुळे आम्हाला

कशास देता खुळे आम्हाला जाती-धर्माची?
चातुर्वरणाची किंवा देऊळ मशिदींची?


अभिमान असावा स्व-धर्माचा,
पण वृथा दुराभिमान नको,
पर-धर्मावर प्रेम करावे,
माणुसकीचे भान असो...

कशास देता खुळे आम्हाला देश तोडण्याची?
स्वतंत्र राज्याची अथवा भाषावार प्रांताची?

स्व-प्रांतावर प्रेम असावे,
पण दुसऱ्याचा द्वेष नको,
आपण सारे भारतीयच,
ह्या गोष्टीचे भान असो...

Monday, December 5, 2011

रुटीनच्या नानाची टांग

सकाळी उठुनी कचेरीस जावे |
संध्याकाळी गर्दीतुनी परतावे ||
अशा दिनचर्येला काय म्हणावे |
कैदेतुनी ह्या कसे मुक्त व्हावे || १ ||


|| जय जय रघुवीर समर्थ ||

मनाच्या तळाशी दडून बसलेला,
एक आवाज हळूच उमटला.
म्हणाला कर एक गोष्ट 'उटपटांग',
तुझ्या फालतू रुटीनच्या नानाची टांग.

मार दांडी एक दिवस ऑफिसला,
मस्त निरर्थक फिरून बघ एकदा.
Laptop-Mobile जा थोड्यावेळ विसरून,
Emails-Meetings काय करायचे हे आठवून?
पावसात मस्त भिजून घे,
मनातले गाणे गाऊन घे.
वेडे होऊन शहाणपणा कर,
नाहीतर ह्या गर्दीतच मर.
कृपा करून Internet चे नाव नको काढूस,
हर एक मिनिटाला Facebook नको पाहूस.
जुन्या आठवणीत हरवून जा,
दोस्त मंडळीत जरा गुंगून जा.
जुनी पत्रे, काही कविता, काही पुस्तके वाच,
थोड्यावेळ स्वतःला विसरून नाच.
रोज जे करतोस ते नको करूस,
लोकांच्या चिंता तू नको वाहूस.

ऑफिस ते घर अन घर ते ऑफिस पुरे झाले आता,
बिलकुल नको मारूस ह्या Busy रुटीनच्या बाता.
तूच काय तो तुझ्या रुटीनचा उपयोग सांग,
म्हणूनच म्हणतो तुझ्या रुटीनच्या नानाची टांग...

मना सज्जना मागणे हेची आता |
जुनी 'दीन'चर्या नको पाळू आता ||
मना सज्जना बंधने तोड आता |
मना सज्जना मुक्तता भोग आता || २ ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Sunday, November 6, 2011

एक चतुर्थांश चक्रव्यूह

पंचविशी पार केली कि बहुतेक सर्वांच्या आयुष्यात असा काळ येतो कि तुम्ही गर्दी बरोबर असता पण तरीही एकटे असता. तुम्हाला अशी जाणीव होऊ लागते कि आता आपली स्वतःची ओळख होणे गरजेचे आहे. मी कोण आहे, माझा ह्या भूतलावरचा ‘उद्देश’ काय आहे असे प्रश्न सतावू लागतात तुम्हाला. 

आजू-बाजूच्या स्वार्थी लांडग्यांची ओळख तुम्हाला अस्वस्थ करून सोडते. आयुष्यातले जे क्षण वाळूसारखे तुमच्या हातातून निसटून गेले आहेत त्यांच्या आठवणीनी मन घायाळ होऊ लागते. ज्या व्यक्ती तुमच्या पासून दूर गेल्या आहेत त्यांच्याशी तुम्ही केलेल्या प्रतारणेचे सुद्धा चटके बसू लागतात मनाला.

तुम्ही तुमच्या नोकरीकडे बघता आणि तुम्हाला वाटू लागते कि हेच हवे होते का मला आयुष्यात? असेच काम करायचे होते का मला? नोकरीतील स्वारस्य पण हळूहळू कमी होऊ लागते. पण आतापर्यंत तुम्ही आयुष्याच्या स्पर्धेचा अविभाज्य घटक बनलेले असता. नोकरी सोडून काय करायचे हे भय तोपर्यंत मनात ठाण मांडून बसलेले असतेच. भीती डोळ्यावरची पट्टी काढूच देत नाही.

शाळा-कॉलेज मधली तुमची मस्ती आठवणी बनून मनाला छळू लागते, डोळ्याच्या कडा ओलावू लागते. काळाचे घड्याळ मागे फिरवून परत बालपणीचे अबोध निरागस दिवस परत आणावेत असे वाटू लागते.
तुमचा स्वतःचा शोध सुरूच असतो, रात्रीच्या अंधारात सुधा डोळे टक्क उघडे असतात, आणि मन विचारांच्या जंजाळात. आपल्या सीमचे काटेरी कुंपण आपल्यालाच टोचू लागते. तुमचे मन आशा-निराशेच्या तराजूत हिंदकाळू लागते.

पैशासाठी विकलेल्या, उराशी जपलेल्या पंखांच्या पाठीवरील जखमा अजूनच ठस-ठसू लागतात. 

घराची, आई-बाबांची, आजी-आजोबांचं, भावंडांची आणि नातेवाईकांची अनिवार ओढ वाटू लागते. परंतु पुढच्याच क्षणी, ते आपल्याला कधी न कधी सोडून जाणारा आहेत ह्याची चिंता चीतेसारखी जाळू लागते. एकटे एकटे वाटून, कातरवेळी मनाची अवस्था विचारधारात हरवलेल्या वेड्या पाखरा सारखी होते…

प्रश्न तर हजारो असतात पण उत्तरे अनुत्तरीत राहतात. आपण आयुष्याच्या चाक्रव्युहातील अभिमन्यू झाल्याची तीव्र जाणीव होऊ लागते आणि ह्यातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याची जाणीव शक्तिहीन करून टाकते. हाच तो एक चतुर्थांश चक्रव्यूह…

Friday, October 14, 2011

मी असा

धुंद मला ना मद्याची, 
ही तर आहे गद्या -पद्याची...

भूक मला ना खाण्याची, 
ही तर सुंदर गाण्याची...

भीती मला ना मरण्याची, 
पण भाव मनातील सरण्याची...

वेड मला ना द्रव्याचे, 
हे तर मुग्ध काव्याचे...

मोहिनी ना मला मोहिनीची, 
ही तर वर्षाधारांची...

भूल मला ना नोटांची, 
ही तर वेड्या बेटांची...

ओढ मला ना फिरण्याची, 
पण फिरताना शब्दांना भेटण्याची... 

संध्याकाळ

आयुष्याच्या संध्याकाळी डोळ्यांमधले थिजले आसू,
पायांमधले त्राण सरले अन ओठांवरले विरले हासू...

अश्रूंच्या कोमट पाण्याने पत्रातील शाई भिजली,
डोळ्यांपुढली अक्षरे दुःखाच्या धुक्यात विरली...

मनातले कढ, आवेग आवरून आवरून निशब्द होत गेले,
मारून टाकलेल्या भावनांमुळे मन सुन्न होत गेले..

हातातून निसटून गेलेल्या क्षणांची आठवण अस्वस्थ करत आहे,
ह्या कातरवेळी मन मावळत्या सूर्यासारखे अंधारामध्ये बुडत आहे...

आयुष्याच्या संध्याकाळी डोळ्यांमधले थिजले आसू,
पायांमधले त्राण सरले अन ओठांवरले विरले हासू...

पुन्हा पाउस

भेटलो आज पावसाला बऱ्याच दिवसांनी,
केल्या काही गुज-गोष्टी बऱ्याच दिवसांनी.

जुन्या मित्राच्या जुन्या आठवणी, भेटल्या पुन्हा नव्या होऊनी,
भेटल्या त्या पावसाच्या सारी अन गेल्या पुन्हा भिजवूनी.

पुन्हा पाउस घेऊन आला आठवांच्या सरी,
वर्षू लागल्या आसवांच्या धारा पुन्हा भुईवरी.

जुने दिवस, जुने क्षण पुन्हा झाले नवे,
भर पावसात, थेंबांच्या धारात मन पण होई ओले.

ढगाळ कुंद हवा आणि मातीचा सुवास,
तुझे ते शब्द, "अशा वेळी तू जवळ हवास..."

असे का मनाचे पावसाशी नाते,
क्षणामध्ये वाटू लागते जग रिते-रिते.

पावसाला मित्र मानू की मानू माझा शत्रू,
डोळ्यात थेंबांच्या सरी देतो, पण कविता लागते पाझरू.

Monday, August 22, 2011

कसले काय, आमचे तर मातीचे पाय...

रस्त्यावरून जाताना इतरांना शिव्या घालू, 
रस्ता मोकळा मिळाला तर  स्वतःही तशीच गाडी चालवू,
पण कोणाचा अपघात झाला तर मदत मात्र करायची नाय,
कसले काय, आमचे तर मातीचे पाय...

ऑफिस मध्ये  बॉस चे सगळे ऐकू,
कितीही शिव्या घातल्या तरी शेवटी पायात शेपूट घालू,
उलटे बोलायची हिम्मतच नाय,
कसले काय, आमचे तर मातीचे पाय...

सकाळचा पेपर चहा बरोबर चवीने वाचू,
त्यातल्या घोटाळ्यांवर झोरदार चर्चा पण  झाडू,
पण कोणाविरुद्ध आवाज उठवायचा नाय,
कसले काय, आमचे तर मातीचे पाय... 

दुसऱ्याबद्दल मोठ्या आवडीने बोलू,
लोकांच्या पाठीमागे त्यांच्याच उखाळ्या-पाखाळ्या काढू,
पण  कोणाला मोठ्या मनाने मदत करायची नाय,
कसले काय, आमचे तर मातीचे पाय...

आपल्या पुरते जगू आणि 
आपल्यासाठीच मरू,
पण कोण दुसऱ्याला जगवायची इच्छा नाय ,
कसले काय, आमचे तर मातीचे पाय...

इतरांना त्रास देऊ आणि 
त्यांना पुरते छळू,
पण कोणाला खुल्या दिलाने दाद द्यायची नाय,
कसले काय, आमचे तर मातीचे पाय...

आजू-बाजूच्या सगळ्या समस्या बघू,
सोयीस्कररित्या त्यांच्याकडे कानाडोळा करू,
पण निधड्या छातीवर संकटे झेलत निस्वार्थ समाजसेवा करायची नाय,
कसले काय, आमचे तर मातीचे पाय...

सोमवार ते शुक्रवार आणि,
ऑफिस ते घर-दार,
ह्याच्यावर आयुष्य जगायचेच नाय,
कसले काय, आमचे तर मातीचे पाय...

देव-देव करू आणि,
पैशावर त्याला विकत घेऊ,
पण आपल्या हिमतीवर एक पाऊल टाकायचे नाय,
देवा परमेश्वरा, कसले काय, आमचे तर मातीचे पाय...